Grapes Pickle Grapes Pickle - Sayali Rajadhyaksha

Delicious Grape's Pickle

नुकतीच नाशिकला जाऊन आले. नाशिक भारतातला सगळ्यात जास्त द्राक्षं पिकवणारा जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांत या भागात मोठ्या संख्येनं वाईनरीजसुद्धा उभ्या राहिल्या आहेत. द्राक्षांच्या तसंच वाइन गाळपाच्या मोसमात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात.

द्राक्षं बहुसंख्य लोकांना आवडतात. पण द्राक्षं हे अतिशय नाजूक फळ असल्यानं त्यावर कीटकनाशकांची फवारणी खूप जास्त केली जाते. पाण्यात कितीही काळ तुम्ही ही द्राक्षं बुडवून ठेवलीत तरी त्यावरचा कीटकनाशकाचा अंश काही जात नाही. शिवाय अनेकांना त्यामुळे अलर्जीसदृश घशाचा त्रास होतो त्यामुळे द्राक्षं खायला नको वाटतं. जी द्राक्षं परदेशी निर्यात होतात त्यांच्यावर किती प्रमाणात औषधं मारली जावीत याचे कडक निकष आहेत. त्यामुळे ते पाळावेच लागतात. पण भारतात जी द्राक्षं विकली जातात त्यावर मात्र भरमसाठ औषधांचा मारा केलेला असतो, अनेकदा शेतकरी अशिक्षित असतात, त्यांच्याकडून माल घेणारे सुचवतील ती औषधं ते मारतात. म्हणून मी तर हल्ली द्राक्षं विकत आणणं बंदच केलं आहे.

काही दिवसांपूर्वी मला समीर पंडित या गृहस्थांचा इनबॉक्समध्ये एक मेसेज आला. ते शेतक-यांच्या एका गटाचे सदस्य आहेत. शेतक-यांचा हा गट कमीतकमी औषधं मारलेली द्राक्षं भारतातल्या कुठल्याही शहरात घरपोच पोचवतो. यासाठी त्यांचं एक पेज आहे, ज्याची लिंक मी काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. तुम्ही ऑर्डर केल्यानंतर ताजी द्राक्षं तोडली जातात आणि ती तुमच्या घरी पोचवली जातात.

परवा मी नाशिकला गेले होते तेव्हा समीर आणि त्यांचे सहकारी श्री. फडके हे दोघेही भेटायला आले होते. त्यांच्याकडून मला ब-याच नव्या गोष्टी कळाल्या. जसं की वाईनसाठी वापरली जाणारी द्राक्षं आणि खायची द्राक्षं वेगळी असतात. ऑरगॅनिक गूळ म्हणजे नुसता रसायनं न वापरता केलेला गूळ नव्हे. तर जमिनीचा कस चांगला हवा, त्यात घातली जाणारी खतं शेणखतासारखी नैसर्गिक हवीत, गूळ करताना भेंडीचा रस वापरला जातो ती भेंडी ऑरगॅनिक हवी. असं सगळं अंमलात आणून तयार केलेला गूळ म्हणजे ऑरगॅनिक गूळ. त्यांनी मला ताडीचाही गूळ दिला आहे. तो वापरून बघितला की त्यावर लिहीन.

त्यांनी मला अतिशय मधुर चवीची करकरीत अशी फ्लेम जातीची द्राक्षं दिली. अनेक दिवसांपासून द्राक्षांचं लोणचं करायचं माझ्या मनात होतं. लोणचं करायला द्राक्षं चांगली करकरीत हवीत, तशी ही होती. मग आज लाल द्राक्षांचं मस्त लोणचं केलंय. आणि ते छान आंबट, गोड, तिखट लागतंय.

सायली राजाध्यक्ष , अन्न हेच पूर्णब्रह्म - Mumbai Masala

लाल द्राक्षांचं लोणचं

साहित्य –
२ वाट्या फ्लेम जातीची द्राक्षं – एकाचे २ तुकडे करून,
२ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद,
१ टीस्पून मीठ (आपल्या चवीनुसार कमीजास्त करा),
२ इंच आल्याचं सालं काढून केलेले बारीक लांबट तुकडे (ज्युलियन्स),
१ मोठ्या लिंबाचा रस

कृती –
१) एका बोलमध्ये द्राक्षं घ्या. त्यात तिखट, मीठ, हळद, आल्याचे तुकडे आणि लिंबाचा रस घाला.
२) चमचा वापरून हलक्या हातानं नीट एकत्र करा. काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.

हे लोणचं लगेचच खायलाही मस्त लागतं. मुरल्यावर खायला बहुधा उद्या उरणार नाही असं वाटतं! फ्रीजमध्ये फारतर २-३ दिवस राहील. करायला अगदी सोपं आहे, त्यामुळे सीझन संपेपर्यंत कितीदाही करता येईल.
आवडत असल्यास अर्धा टीस्पून मोहरीची पूडही घालता येईल.
More in this category: « Creamy Fondue & Grapes